श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय ११

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय अकरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
मागील अध्यायात ग्रंथ कर्त्याने बाळप्पा हे मुरगोड गावी आल्याचे वर्तमान कथन केले आहे. तेथेच होऊन गेलेल्या, चिदंबर दिक्षित नावाच्या सत्पुरुषाच्या कार्याचे कथनही ग्रंथ कर्त्याने केले आहे.
सर्वप्रथम मुरगोड गावातच बाळप्पाना श्री स्वामीं विषयी माहिती समजली. परंतु काही ब्राह्मणांनी अक्कलकोटला जाण्या ऐवजी श्री दत्त क्षेत्री म्हणजेच गाणगापूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बाळप्पा गाणगापूर येथे दाखल झाले.
गाणगापूरात बरेचसे भक्त मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत असत. कुणी संततीसाठी तर कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी भक्तजन गाणगापूरात दाखल होत असत. बाळप्पा मात्र सद्गुरूचा ध्यास घेऊन गाणगापूरात दाखल झाले.
गाणगापूरात पोहोचल्यावर बाळप्पांनी स्वतःला दत्त सेवेत झोकून दिले. बाळप्पा नित्य स्नान, मध्यान्ह स्नान, संध्या वंदन करुन नित्य नियमाने जपध्यान व नामस्मरण करीत आपला दिनक्रम चालवू लागले. आणि माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करू लागले.
पुढे काही महिन्यांनी स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात तीन यतीमुर्ती समोर येऊन उभ्या ठाकल्या. आणखी पुढे पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा स्वप्न दृष्टांत झाला. स्वप्नात एका ब्राह्मणाने दर्शन दिले. व अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी सेवा करा असे सांगितले.
मध्यान्ह स्नान आटोपते वेळी वस्त्रा खाली बाळप्पांना एक विंचू दिसला. पण त्याला न मारता तसेच सोडून दिले. आणि मंदिरात परतताना त्यांना अनेक शुभ संकेत प्राप्त झाले. व माधुकरीत त्यांना मिष्ठान्न खायला मिळाले. अक्कलकोटला जाण्यास हाच दिवस शुभ मानून, बाळप्पा अक्कलकोटला निघाले. पुढे त्यांनी अक्कलकोटला येऊन स्वतःला श्री स्वामी सेवेत झोकून दिले. त्यांच्या पुर्व पुण्याई मुळेच बाळप्पांना श्री स्वामींचा अनेक वर्षे सहवास लाभला. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या अकराव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय अकरावा देत आहोत.
अध्याय अकरावा
श्रीगणेशाय नम:।
मागलें अध्यायीं वर्णिले। बाळाप्पा मुरगोडीं आले।
पुण्यस्थानीं राहिले। तीन रात्री आनंदें ॥1॥
तेथें कळला वृत्तांत। अक्कलकोटीं साक्षात।
यतिरूपें श्रीदत्त। वास्तव्य सांप्रत करिताती ॥2॥
परी मुरगोडीचे विप्र। बाळाप्पासी सांगत।
गाणगापूर विख्यात। महाक्षेत्र भीमातीरीं ॥3॥
तेथें आपण जावोनी। बैसावें हो अनुष्ठानीं।
श्री गुरु स्वप्नीं येवोनी। सांगती तैसें करावें ॥4॥
मानवला तयासी विचार। निघाले तेथुनी सत्वर।
जवळीं केले गाणगापूर। परम पावन स्थान तें ॥5॥
बाळाप्पा तेथें पातले। स्थान पाहोनी आनंदले।
नृसिंहसरस्वती पाउलें। प्रेमभावें वंदिली ॥6॥
प्रात:काळीं उठोनी। संगमावरी स्नान करोनी।
जप ध्यान आटपोनी। मागुती येती गांवांत ॥7॥
सेवेकर्यांबरोबरी। मागोनिया मधुकरी।
भोजनोत्तर संगमावरी। परतोनी येती ते ॥8॥
माध्याह्न स्नान करोनी। पुन्हा बैसती जप ध्यानी।
अस्ता जातां वासरमणी। संध्यास्नान करावें ॥9॥
करोनिया संध्यावंदन। जप आणि नामस्मरण।
रात्र पडतां परतोन। ग्रामामाजी येती ते ॥10॥
सदगुरु प्राप्तीकरितां। सोडुनी गृह-सुत-कांता।
शीतोष्णाची पर्वा न करितां। आनंदवृत्ती राहती ॥11॥
शीतोष्णाचा होय त्रास। अर्धपोटीं उपवास।
परी तयांचें मानस। कदा उदास नोहेची ॥12॥
अय्याराम सेवेकरी। राहत होते गाणगापुरीं।
त्यांनी देखुनी ऐसीपरी। बाळाप्पासी बोलती ॥13॥
तुम्हीं भिक्षा घेवोनी। नित्य यावें आमुचे सदनीं।
जें जें पडेल तुम्हांस कमी। तें तें आम्हीं पुरवूं जी ॥14॥
बाळाप्पासी मानवलें। दोन दिवस तैसें केलें।
पोट भरोनी जेवले। परी संकोच मानसीं ॥15॥
जाणें सोडिलें त्याचे घरीं। मागोनिया मधुकरी।
जावोनिया संगमावरी। झोळी उदकीं बुडवावी ॥16॥
आणोनिया बाहेरी। बैसोनी तिथे शिळेवरी।
मग खाव्या भाकरी। ऐसा नेम चालविला ॥17॥
ऐसे लोटले कांहीं दिवस। सर्व शरीर झाले कृश।
निशीदिनीं चिंता चित्तास। सदगुरु प्राप्तीची लागली॥18॥
हीन आपुलें प्राक्तन। भोग भोगवी दारुण।
पहावे सदगुरुचरण। ऐसें पुण्य नसेची ॥19॥
एक मास होता निश्चिती। स्वप्नीं तीन यतीमूर्ती।
येवोनिया दर्शन देती। बाळाप्पा चित्तीं सुखावें ॥20॥
पंधरा दिवस गेल्यावरी। निद्रिस्थ असतां एके रात्रीं।
एक ब्राह्मण स्वप्नाभीतरीं। येवोनिया आज्ञापी ॥21॥
अक्कलकोटीं श्रीदत्त। स्वामीरुपें नांदत।
तेथें जाउनी त्वरीत। कार्य इच्छित साधावें ॥22॥
आपण केले अनुष्ठान। परी तें न जाहलें पूर्ण।
आणखीही कांहीं दिन। क्रम आपुला चालवावा ॥23॥
मग कोणे एके दिवशीं। बाळाप्पा आले संगमासी।
वृक्षातळीं ठेवुनी वस्त्रासी। गेले स्नान करावया ॥24॥
परतले स्नान करोनी। सत्वर आले त्या स्थानीं।
वस्त्र उचलितां खालोनी। वृश्चिक एक निघाला॥25॥
तयासी त्यांनीं न मारिलें। नित्यकर्म आटोपिलें।
ग्रामामाजी परत आले। गेले भिक्षेकारणें॥26॥
त्या दिवशीं ग्रामाभीतरीं। पक्वान्न मिळालें घरोघरीं।
बाळाप्पा तोषले अंतरीं। उत्तम दिन मानिला ॥27॥
अक्कलकोटीं जावयासी। निघाले मग त्याच दिवशीं।
उत्तम शकुन तयांसी। मार्गावरी जाहले ॥28॥
चरण-चाली चालोनी। अक्कलकोटीं दुसरे दिनीं।
बाळाप्पा पोंचले येवोनी। नगरी रम्य देखिली॥29॥
जेथें नृसिंह सरस्वती। यतिरूपें वास करिती।
तेथें सर्व सौख्यें नांदती। आनंद भरला सर्वत्र ॥30॥
तया क्षेत्रींचें महिमान। केवीं वर्णूं मी अज्ञान।
प्रत्यक्ष जें वैकुंठभुवन। स्वामी कृपेनें जाहलें ॥31॥
इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
श्रोेते सदा परिसोत। एकादशोध्याय गोड हा ॥32॥
श्रीरस्तु ॥ शुभं भवतु॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
