श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामीभक्तजनांना माझा नमस्कार. आपणा सर्वांना श्री स्वामी चरीत्र सारामृताची महती ठाऊकच आहे. त्यामुळे मुढपणे त्या महतिचे मी इथे बखाण करणार नाही. तुम्हाला माहीतच आहे की, श्री स्वामी चरीत्र सारामृत हे काव्यस्वरूपात आहे. त्यामुळे काही जनांना ते कळण्यास कठीण जाते. त्यामुळे हे श्री स्वामी चरीत्र सारामृत सामान्य जनांपर्यंत साध्या सरळ भाषेत पोहचवण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी माझ्या या प्रयत्नांना यश मिळो ही स्वामीं चरणी तसेच वाचकांना प्रार्थना. तर आज या कथणाची सुरूवात करत आहे, त्याचा सर्व स्वामी भक्तांनी लाभ घ्यावा.

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद)
अध्याय पहिला

श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरू, श्री कुलदैवत, अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार, यतीवर्य, श्री स्वामीराज यांना वंदन करून ग्रंथ रचियेते कै. विष्णु बळवंत थोरात यांनी श्री स्वामी चरीत्र सारामृत या नित्य पठण उपयोगी पोथीच्या लिखाणाला प्रारंभ केला आहे.

सर्वप्रथम आरंभ देवता व श्री सद्गुरू यांना वंदन करून जगत्चालक, विश्वनियत्ता श्री विष्णू देव यांची स्तुती, ग्रंथ कर्त्याने विविध गुणविशेषणांनी केलेली आहे. श्री विष्णूदेव रूपाचे सगुण वर्णन, त्यांची आयुधे आणि वाहन यांची महती वर्णन करून, पुढे ज्याची महती वर्णन करण्यास वेदही असमर्थ ठरेल त्या महाविष्णू अवतार पाशी, श्री स्वामी चरीत्र सारामृत निर्विघ्नपणे लिहून पूर्ण होवो असे आर्जवही करण्यांत आले आहे.

त्यानंतर ब्रह्मकुमारी शारदा, गुरूवर्य, माता पिता यांना ग्रंथ कर्त्याने वंदन केले असून त्रिगुणात्मक त्रिमुर्ती अशा श्री दत्तात्रयांचे स्मरण करताना, कलियुगात क्षीण होत गेलेली धर्म वासना पुन्हा मुळपदावर आणण्यासाठी अवतरलेल्या अत्रीपुत्र श्री दत्तात्रयांची महती कथन करून, ग्रंथ कर्त्याने पुढे कवी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन, श्रीधर, तूकाराम आदी संतकवी तसेच पंथ कवींनाही आदरभावे वंदन केलेले आहे.

आपल्यापाशी ग्रंथ रचना निर्मिती करण्याचे सामर्थ्य नाही, याची कबुली देताना ग्रंथकार पुढे असेही सांगतात की, समस्त देवदेवता, साधुसज्जन, सत्पुरुष, संतश्रेष्ठांनी आशिर्वाद पुर्वक बळ पूरवीले तर माझ्या हातून श्री स्वामी चरीत्र सारामृताचे लेखन निर्विघ्नपणे आणि विनासायास होईल आणि इथेच या पहिल्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सोबतच आम्ही इथे आपणासाठी मुळ स्वामी चरीत्र सारामृत अध्याय पहिला देत आहोत.

अध्याय पहिला


श्री गणेशाय नम:॥ श्री सरस्वत्यै नम:॥
श्री गुरुभ्यो नम:॥ श्री कुलदेवतायै नम:॥
श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगंबर
यतिवर्य स्वामीराजाय नम:॥

ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्॥

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं।
भावातीतं त्रिगुणरहितं सद तं नमामि॥

ॐ रक्तांङ्ग, रक्तवर्ण, पद्मनेत्र, सुहास्यवदनं,
कंथा – टोपी – च – माला दण्डकमण्डलुधर, कटयांकर,
रक्षक, त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक, विश्वनायक भक्तवत्सल,
कलियुगे, श्रीस्वामीसमर्थावतारधारक पाहि माम् ॥

जयजय क्षीरसागरविलासा। मायाचक्रचालका अविनाशा।
शेषशयना अनंतवेषा। अनामातीता अनंता ॥1॥

जो सकळ विश्वाचा जनिता। समुद्रकन्या ज्याची कांता।
जो सर्व कारण कर्ता। ग्रंथारंभीं नमूं तया ॥2॥
त्या महाविष्णूचा अवतार। गजवदन शिवकुमर।
एकदंत फरशधर। अगम्य लीला जयाची ॥3॥

तया मंगलासी साष्टांग नमन। करुनी मागे वरदान।
स्वामीचरित्रसारामृत पूर्ण। निर्विघ्नपणें होवो हें ॥4॥

जिचा वरप्रसाद मिळतां। मूढ पंडित होती तत्त्वतां।
सकळ काव्यार्थ येत हाता। ती ब्रह्मसुता नमियेली ॥5॥

जो अज्ञानतिमिरनाशक। अविद्याकाननच्छेदक।
जो सद्बुध्दीचा प्रकाशक। विद्यादायक गुरुवर्य ॥6॥

तेवीं असती मातापितर। तैसेचि श्रेष्ठ गुरुवर्य।
चरणीं त्यांचिया नमस्कार। वारंवार साष्टांग॥7॥

ब्रह्मा विष्णु महेश्वर। तिन्ही देवांचा अवतार।
लीलाविग्रही अत्रिकुमर। दत्तात्रय नमियेला ॥8॥

धर्मसंस्थापना कारणें। युगायुगीं अवतार घेणें।
नानाविध वेष नटणें। जगत्पतीचें कर्तव्य ॥9॥

मग घेतसे अवतार। प्रत्यक्ष जो कां अत्रिकुमर।
अक्कलकोटीं साचार । प्रसिध्द झाला स्वामीरूपें ॥10॥

कोठें आणि कोणत्या काळीं। कोण्या जातींत कोणत्या कुळीं।
कोण वर्णाश्रम धर्म कुळीं। कोणासही कळेना ॥11॥

ते स्वामी नामें महासिध्द। अक्कलकोटीं झाले प्रसिध्द।
चमत्कार दाविले नानाविध। भक्तमनोरथ पुरविले ॥12॥

त्यांसी साष्टांग नमोनी। करी प्रार्थना कर जोडोनी।
आपुला विख्यात महिमा जनीं। गावयाचें योजिलें ॥13॥

कर्ता आणि करविता। तूंची एक स्वामीनाथा।
माझिया ठाई वार्ता। मीपणाची नसेची ॥14॥

ऐसी ऐकुनिया स्तुती। संतोषली स्वामीराजमूर्ति।
कविलागीं अभय देती। वरद हस्तें करोनी ॥15॥

आतां नमूं साधुवृंद। ज्यांसी नाहीं भेदाभेद।
ते स्वात्मसुखीं आनंदमय। सदोदित राहती ॥16॥

व्यास वाल्मीक महाज्ञानी। बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी।
वारंवार तयांच्या चरणीं। नमन माझे साष्टांग ॥17॥

कविकुलमुकुटावतंस। नमिले कवि कालिदास।
ज्यांची नाट्यरचना विशेष। प्रिय जगीं जाहली ॥18॥

श्रीधर आणि वामन। ज्यांची ग्रंथरचना पाहोन।
ज्ञातेही डोलविती मान। तयांचे चरण नमियेले ॥19॥

ईशचरणीं जडलें चित्त। ऐसे तुकारामादिक भक्त।
ग्रंथारंभीं तयां नमित। वरप्रसादाकारणें ॥20॥

अहो तुम्ही संत जनीं। मज दीनावरी कृपा करोनी।
आपण हृदयस्थ राहोनी। ग्रंथरचना करवावी ॥21॥

आतां करु नमन। जे का श्रोते विचक्षण।
महाज्ञानी आणि विद्वान। श्रवणीं सादर बैसले ॥22॥

परी हें अमृत जाणोनी। आदर धरावा जी श्रवणीं।
असे माझी असंस्कृत वाणी। तियेकडे न पहावें ॥23॥

स्वामींच्या लीला बहुत। असती प्रसिध्द लोकांत।
त्या सर्व वर्णितां ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥24॥

त्या महोदधींतुनी पाहीं। अमोल मुक्ताफळें घेतलीं कांहीं।
द्यावया मान सूज्ञांहीं। अनमान कांहीं न करावा ॥25॥

इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथासंमत।
आदरे भक्त परिसोत। प्रथमोध्याय गोड हा ॥26॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृते मंगलाचरणं
नाम प्रथमोऽध्याय गोड हा: ॥
श्री शंकरार्पणमस्तु । श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु ॥

पहिला अध्याय इथे समाप्त होतो. थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||