
श्री स्वामी समर्थ, अपना सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आजच्या श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवादाच्या दुसऱ्या अध्यायात आपणा सर्वांचे स्वागत.
जे भक्त आपल्या मनात अपेक्षा धरून सद्गुरूंची सेवा आणि भक्ती करतात त्यांचे मनोरथ पुर्ण होते, आणि जे भक्त आपल्या मनात कसलीही अपेक्षा न बाळगता निश्काम भावनेने सद्गुरू भक्ती आणि सेवा करतात त्यांना मोक्ष म्हणजेच कैवल्य पदांची प्राप्ती होते.
श्री गुरूचरित्रामध्ये दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंहसरस्वती कर्दळी वनात गुप्त झाल्याची कथा आहे. हेच पुढे लोकोद्धार करण्यासाठी श्री स्वामी समर्थ यांच्या रूपाने अक्कलकोटात स्थिर झाले अशी धारणा आहे. मात्र एका भक्ताने श्री स्वामींची जन्मपत्रिका बनवून त्यांच्या अवतारा विषयी निराळे भाष्य केले आहे. या विषयीचे तर्क वितर्क काही असो. मात्र, श्री स्वामी हे सर्वसामान्य जनांच्या उद्धारासाठी मानवी देह धारण करून अक्कलकोट येथे अवतरले हेच सत्य आहे.
या विषयीचा एक प्रसंग असा घडला की, राचप्पा मोदी यांच्या घरी श्री स्वामी बसले असताना कोणी कलकत्त्याच्या साहेब दर्शनाच्या हेतूने स्वामींपाशी आला. आणि आपण कोठून आलात असे श्री स्वामींना कुतूहल पुर्वक विचारू लागला. त्यावर श्री स्वामींनी हसून त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले.
आम्ही प्रथम कर्दळी वनातुन निघालो आणि त्यानंतर कलकत्ता, हरिद्वार, केदारेश्वर आणि गोदा तीरावरील अनेक तीर्थे पहात हैद्राबाद, मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपुर, मोहोळ, सोलापूर करीत आलो. मंगळवेढा येथे श्री स्वामींनी तब्बल बारा वर्षे वास्तव्य केले.
तेथे अरन्यात राहणार्या श्री स्वामींचे रूप मंगळवेढाच्या अजाण भक्तांनी जाणले नाही. मात्र दिगंबर व्रृत्तीने राहणार्या या वेड्या बुवांचे हे स्वरूप त्या ग्रामस्थांना ऊमगे पर्यंत श्री स्वामी मंगळवेढा येथुन पुढे पंढरपूर या दिशेने कायमचे निघून गेले. आणि इथेच दुसऱ्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय दुसरा देत आहोत.
अध्याय दुसरा
श्री गणेशाय नम: ॥
कामना धरोनी जे भजती। होय त्यांची मनोरथपूर्ती।
तैसेंची निष्काम भक्तांप्रती। कैवल्यप्राप्ती होतसे ॥1॥
अक्कलकोटामाझारी। राचाप्पा मोदी याचे घरीं।
बैसली समर्थांची स्वारी। भक्तमंडळी वेष्टित ॥2॥
साहेब कोणी कलकत्त्याचा। हेतु धरोनी दर्शनाचा।
पातला त्याच दिवशीं साचा। आदर तयाचा केला कीं ॥3॥
त्याजसवें एक पारसी। आला होता दर्शनासी।
ते येण्यापूर्वीं मंडळीसी। महाराजांंनी सुचविलें ॥4॥
तीन खुर्च्या आणोनी बाहेरी। मांडा म्हणती एके हारीं।
दोघांसी बैसवोनी दोहोंवरीं। तिसरीवरी बैसले आपण ॥5॥
पाहोनी समर्थांचें तेज। उभयतांसी वाटलें चोज।
साहेबानें प्रश्न केला सहज। आपण आला कोठुनी ॥6॥
स्वामींनी हास्यमुख करोनी। उत्तर दिलें तयालागोनी।
आम्ही कर्दळीवनांतुनी। प्रथमारंभी निघालों ॥7॥
मग पाहिलें कलकत्ता शहर। दुसरीं नगरें देखिलीं अपूर्व।
बंगालदेश समग्र। आम्हीं असे पाहिला ॥8॥
घेतलें कालीचें दर्शन। पाहिलें गंगातटाक पावन।
नाना तीर्थें हिंडोन। हरिद्वाराप्रती गेलों ॥9॥
पुढें पाहिलें केदारेश्वर। हिंडलों तीर्थें समग्र।
ऐशीं हजारो हजार। नगरें आम्हीं देखिलीं ॥10॥
मग तेथुनी सहज गती। पातलों गोदातटाकाप्रती।
जियेची महा प्रख्याती। पुराणांतरीं वर्णिली ॥11॥
केले गोदावरीचें स्नान। स्थळें पाहिलीं परम पावन।
कांहीं दिवस फिरोन। हैदराबादेसी पातलों ॥12॥
येऊनीया मंगळवेढ्यास। बहुत दिवस केला वास।
मग येउनि पंढरपुरास। स्वेच्छेनें तेथें राहिलों ॥13॥
तदनंतर बेगमपुर। पाहिलें आम्हीं सुंदर।
रमलें आमुचें अंतर। कांहीं दिवस राहिलों ॥14॥
तेथोनी स्वेच्छेनें केवळ। मग पाहिलें मोहोळ।
देश हिंडोनी सकळ। सोलापुरीं पातलों ॥15॥
तेथें आम्हीं कांहीं महिने । वास केला स्वेच्छेनें ।
अक्कलकोटाप्रती येणें। तेथोनिया जहालें ॥16॥
तैंपासुनी या नगरांत। आनंदें आहों नांदत।
ऐसें आमुचें सकल वृत्त। असे मुळापासोनी ॥17॥
द्वादश वर्षें मंगळवेढ्याप्रती। राहिले स्वामीराज यती।
परी त्या स्थळीं प्रख्याती। विशेष त्यांची न जाहली ॥18॥
दर्शना येतां साधू दिगंबर। लीलाविग्रही यतिवर्य।
कंबरेवरी ठेऊनी कर। दर्शन देती तयांसी ॥19॥
इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथासंमत।
आनंदें भक्त परिसोत। द्वितीयोध्याय गोड हा ॥20॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते द्वितीयोऽध्याय:।
श्री रस्तु । शुभ मस्तु ॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||





