श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय १४

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय चौदावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
श्री स्वामी कृपेमुळेच या ग्रंथाचे तेरा अध्याय पुर्ण होऊ शकले. आता त्याच कृपेच्या बळावर हा चौदावा अध्याय वदवून घ्यावा. अशी विनंती,श्री स्वामींं चरणी करुन ग्रंथकार अध्यायाला प्रारंभ करतात.
श्री स्वामींची भक्ती कशी करावी असे प्रश्न अनेक भक्तजन ग्रंथकारांना करत असत. तेव्हा या अध्यायातून ग्रंथकाराने त्यांची उत्तरे दिली आहेत. व भक्तांच्या मनातील शंकांचे, समस्यांचे निरसन केले आहे. भक्ती, साधना व उपासना कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे.
सकाळी उठून आधी श्री स्वामींचे स्मरण करावे, त्यानंतर शुद्ध मनाने सर्व नित्यकर्मे आटोपून आसनावर बसावे. श्री स्वामींची मनोभावे पुजा करावी. एकाग्र चित्ताने श्री स्वामींना स्नान घालावे, हिणा अत्तर लावून चंदनाचा लेप करावा. सुगंधी चाफ्याची फुले श्री स्वामींच्या आवडीची त्यामुळे ती वहावी. चाफ्याची फुले उपलब्ध नसतील तर कोणतीही फुले अर्पण करू शकता.
धुप, दिप, नैवेद्य आणि तांबूल वाहून श्री स्वामीं पुढे दक्षिणा ठेवावी. श्री स्वामींना नमस्कार करून नामस्मरण व प्रार्थना स्तोत्र म्हणावे. शक्य असल्यास श्री स्वामींची सहस्त्रनामावली उच्चारून विविध गुणविशेषणांनी व वैशिष्ट्यांनी नटलेल्या श्री स्वामींच्या अवतार कार्याची भजने गावीत.
श्री स्वामींच्या चरणी मस्तक ठेऊन, आपल्या कुटुंबीयांचे व समाजाचे स्वास्थ्य उत्तम रहावे व सर्व कार्ये पुर्णत्वास यावी याकरिता प्रार्थना करावी. दर गुरुवारी उपोषण करावे. आणि प्रदोष समयी उपोषण सोडावे व श्री स्वामी पुजन करावे. त्यामुळे चित्त व बुद्धी सदऋष्ट होते. जपध्यान करावे तसेच मानस पुजाही श्री स्वामींना प्रिय आहे.
आपण श्री स्वामी भक्त आहोत याचा कधीही अहंकार बाळगू नये. जे दांभिक भक्ती करतात त्यांवर श्री स्वामी समर्थ कसे बरे प्रसन्न होतील? जे भक्त शूद्ध चित्ताने व मनापासून भक्ती करतात तेच भक्त श्री स्वामींना प्रिय आहेत.
ग्रंथ कर्त्याने या अध्यायात श्री स्वामी सेवा कशी करावी याबद्दल सांगून ह्या चौदाव्या अध्यायाची समाप्ती केली आहे.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय चौदावा देत आहोत.
अध्याय चौदावा
श्री गणेशाय नम:।
जयजयाजी करुणाघना। जयजयाजी अघशमना।
जयजयाजी परमपावना। दीनबंधो जगदगुरु ॥1॥
प्रात:काळीं उठोन। आधीं करावें नामस्मरण।
अंतरीं ध्यावे स्वामीचरण। शुद्धमन करोनी ॥2॥
प्रात:कर्में आटपोनी। मग बैसावें आसनीं।
भक्ती धरोनी स्वामीचरणीं। पूजन करावें विधियुक्त ॥3॥
एकाग्र करोनी मन। घालावे शुुद्धोदक स्नान।
सुगंध चंदन लावोन। सुवासिक कुसुमें अर्पावीं ॥4॥
धूप-दीप-नैवेद्य। फल तांबूल दक्षिणा शुद्ध।
अर्पावें नाना खाद्य। नैवेद्याकारणें स्वामींच्या ॥5॥
षोडशोपचारें पूजन। करावें सद्भावें करून।
धूप-दीपार्ती अर्पून। नमस्कार करावा ॥6॥
मग करावी प्रार्थना। जयजयाजी अघहरणा।
परात्परा कैवल्यसदना। ब्रह्मानंदा यतिवर्या ॥7॥
जयजयाजी पुराणपुरुषा। लोकपाला सर्वेशा।
अनंत ब्रह्मांडाधीशा। वेदवंद्या जगदगुरु ॥8॥
सुखधामनिवासिया। सर्वसाक्षी करुणालया।
भक्तजन ताराया। अनंतरूपें नटलासी ॥9॥
तूं अग्नी तूं पवन। तूं आकाश तूं जीवन।
तूंची वसुंधरा पूर्ण। चंद्र सूर्य तूंच पैं ॥10॥
तूं विष्णु आणि शंकर। तूं विधाता तूं इंद्र।
अष्टदिक्पालादि समग्र। तूंच रूपें नटलासी ॥11॥
कर्ता आणि करविता। तूंच हवी आणि होता।
दाता आणि देवविता। तूंच समर्था निश्चयें ॥12॥
जंगम आणि स्थिर। तूंच व्यापिलें समग्र।
तुजलागीं आदिमध्याग्र। कोठें नसे पाहतां ॥13॥
असोनिया निर्गुण। रूपें नटलासी सगुण।
ज्ञाता आणि ज्ञान। तूंच एक विश्वेशा ॥14॥
वेदांचाही तर्क चांचरे। शास्त्रांतेंही नावरे।
विष्णु शंकर एकसरें। कुंठित झाले सर्वही ॥15॥
मी केवळ अल्पमती। करूं केवीं आपुली स्तुती।
सहस्रमुखही निश्चिती। शिणला ख्याती वर्णितां ॥16॥
दृढ ठेविला चरणीं माथा। रक्षावें मजसी समर्था।
कृपाकटाक्षें दीनानाथा। दासाकडे पाहावें ॥17॥
आतां इतुकी प्रार्थना। आणावी जी आपुल्या मना।
कृपासमुद्रीं या मीना। आश्रय देईजे सदैव ॥18॥
पाप ताप आणि दैन्य। सर्व जावो निरसोन।
इहलोकीं सौख्य देवोन। परलोकसाधन करवावें ॥19॥
दुस्तर हा भवसागर। याचे पावावया पैलतीर।
त्वन्नाम तरणी साचार। प्राप्त होवो मजला ते ॥20॥
आशा मनीषा तृष्णा। कल्पना आणि वासना।
भ्रांती भुली नाना। न बाधोत तुझ्या कृपें ॥21॥
किती वर्णूं आपुले गुण। द्यावें मज सुख साधन।
अज्ञान तिमिर निरसोन। ज्ञानार्क हृदयीं प्रगटो पैं ॥22॥
शांती मनीं सदा वसो। वृथाभिमान नसो।
सदा समाधान वसो। तुझ्या कृपेनें अंतरीं ॥23॥
भवदु:खे हें निरसो। तुझ्या भजनीं चित्त वसो।
वृथा विषयांची नसो। वासना या मनातें ॥24॥
सदा साधु-समागम। तुझें भजन उत्तम।
तेणें होवो हा सुगम। दुर्गम जो भवपंथ ॥25॥
व्यवहारीं वर्ततां। न पडो भ्रांती चित्ता।
अंगी न यावी असत्यता। सत्यें विजयी सर्वदा ॥26॥
आप्तवर्गाचें पोषण। न्याय मार्गावलंबन।
इतुकें द्यावे वरदान। कृपा करोनी समर्था ॥27॥
असोनियां संसारात। प्राशीन तव नामामृत।
प्रपंच आणि परमार्थ। तेणें सुगम मजलागीं ॥28॥
ऐशी प्रार्थना करितां। आनंद होय समर्था।
संतोषोनी तत्वत्तां। वरप्रसाद देतील ॥29॥
गुरुवारी उपोषण। विधियुक्त करावें स्वामीपूजन।
प्रदोषसमय होतां जाणून। उपोषण सोडावें ॥30॥
श्रीस्वामी समर्थ। ऐसा षडाक्षरी मंत्र।
प्रीतीनें जपावा अहोरात्र। तेणें सर्वार्थ पाविजे ॥31॥
प्रसंगीं मानसपूजा करितां। तेही प्रिय होय समर्था।
स्वामीचरित्र वाचितां ऐकतां। सकल दोष जातील ॥32॥
कैसी करावी स्वामीभक्ती। हें नेणें मी मंदमती।
परी असतां शुद्ध चित्तीं। तेची भक्ती श्रेष्ठ पैं ॥33॥
आम्हीं आहों स्वामीभक्त। मिरवूं नये लोकांत।
जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ। निष्फळ भक्ती तयाची ॥34॥
इति श्री स्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा ऐकोत भाविक भक्त। चतुर्दशोध्याय गोड हा ॥35॥
श्रीरस्तु ॥ शुभं भवतु॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
