श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १३

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १३

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय तेरावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

बाळप्पा हे श्री स्वामी सेवेत रूजू झाले. बाळप्पांच्या वाढत्या प्रभावामुळे सेवेकर्यांमधील अनेकजण नाराज होऊ लागले. श्रीपाद भटांनी तसेच अनेक सेवेकरांनी बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्यासाठी अनेक खटाटोपी केल्या. पण श्री स्वामी कृपेने त्या सर्व निष्फळ ठरल्या. या बद्दलचा वृत्तांत आपण मागील अध्यायात पाहीला.

बाळप्पा हे पुर्वीचे गृहस्थाश्रमीचे असल्या कारणाने, बाळप्पांना श्री स्वामी सेवेतील काही कामे करन्यास लज्जा वाटत असे. त्यामुळे श्री स्वामी सतत बाळप्पांनाच कामे सांगत. एकदा श्री स्वामींनी बाळप्पांना उपदेश केला ‘नीर्लज्जेसी सानीध्य गुरौ’. म्हणजेच जो शिष्य आपल्या गुरूची कोणत्याही प्रकारची सेवा मनात लाज न बाळगता करतो, त्याला सदैव गुरूची साथ मिळते. आणि बाळप्पा पुढे निःसंकोचपणे श्री स्वामी सेवा करू लागले.

बाळप्पांचा हा समर्पन भाव सुंदरा बाईंना आणि काही सेवेकर्यांना जाचक वाटत असे. एका मध्य रात्री श्री स्वामींनी लघुशंका लागली म्हणून इतर कोणाला न उठवता बाळप्पांना उठवले त्यामुळे बाळप्पा विषयीचा द्वेष सुंदरा बाईंच्या मनात आणखी वाढला. कानामागून आला आणि तिखट झाला असे विचार सुंदरा बाई करू लागल्या.

कोण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. सना निमित्त तो चंद्रहार श्री स्वामींना घालावा असा विचार राणीसाहेबांच्या मनात आला. तो चंद्रहार घेण्यासाठी राणीसाहेबांनी एका शिपायाला बाळप्पांकडे पाठवले. पण बाळप्पांनी त्या चंद्रहारावर चोळप्पांची जबाबदारी सांगून, चंद्रहार देण्यास नकार दिला. आणि त्यावेळी चोळप्पा मठात रहात नसल्या कारणाने आमची जबाबदारी नाही असे सांगून नकार दिला.

शिपायाने राजवाड्यात परतून राणीसाहेबांना घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळी राणीचा सुंदरा बाईंवर खुप विश्वास होता. सुंदरा बाईंनी चोळप्पांन विषयी राणीसाहेबांचे कान फुंकले. व चोळप्पांना मिळणारा मेहेनताना राणीसाहेबांकरवी बंद करण्याचा प्रयत्न केला पण श्री स्वामी कृपेने तो प्रयत्न निष्फळ ठरला.

बाळप्पां विषयीही सुंदरा बाई श्री स्वामीं जवळ कागाळ्या करू लागल्या. तेव्हा श्री स्वामींनी बाळप्पांना मारूतीच्या मंदिरात बसून नामस्मरण करण्यास सांगितले. पुढे श्री स्वामींनी सुंदरा बाईंनाही आपल्यापासून दूर केले. आणि सुंदरा बाईंची कारकीर्द संपुष्टात आली. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या तेराव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय तेरावा देत आहोत.

अध्याय तेरावा

श्रीगणेशाय नम:।
शुक्लपक्षीचा शशिकर। वाढे जैसा उत्तरोत्तर।
तैसें हें स्वामीचरित्र। अध्यायाध्यायीं वाढलें ॥1॥

द्वादशाध्यायाचे अंतीं। श्रीपादभट्ट बाळाप्पाप्रती।
कपट युक्तीनें फसवूं पाहती। परी झाले व्यर्थची ॥2॥

स्वयंपाकादिक करावयासी। लज्जा वाटतसे त्यासी।
तयातें एके समयासी । काय बोलती समर्थ ॥3॥

निर्लज्जासी सन्निध गुरू। असे जाण निरंतरू।
ऐसे बोलतां सदगुरु। बाळाप्पा मनीं समजला ॥4॥

सेवेकर्‍यांमाजी वरिष्ठ। सुंदराबाई होती तेथे ।
तिनें सेवेकर्‍यांस नित्य। त्रास द्यावा व्यर्थची ॥5॥

नाना प्रकार बोलोन। करी सर्वांचा अपमान।
परी बाळाप्पावरी पूर्ण। विश्वास होता तियेचा ॥6॥

परी कोणे एके दिवशीं। मध्यरात्रीच्या समयासी।
लघुशंका लागतां स्वामीसी। बाळाप्पातें उठविलें ॥7॥

तैंपासुनी बाळाप्पासी। त्रास देत अहर्दिशीं।
गार्‍हाणें सांगतां समर्थांसी। बाईतें शब्दें ताडिती ॥8॥

अक्कलकोटीं श्रीसमर्थ। प्रथमत: ज्याचे घरी येत।
तो चोळाप्पा विख्यात। स्वामीभक्त जाहला ॥9॥

एक तपपर्यंत। स्वामीसेवा तो करीत।
तयासी द्रव्याशा बहुत। असे सांप्रत लागली ॥10॥

दिवाळीचा सण येता। राजमंदिरामाजी समर्थ।
राहिले असतां आनंदांत। वर्तमान वर्तलें ॥11॥

कोण्या भक्तें समर्थांसी। अर्पिलें होतें चंद्रहारासी।
सणानिमित्त त्या दिवशीं। आंगावरी घालावा ॥12॥

राणीचिये मनांत। विचार येता त्वरीत।
सुंदराबाईसी बोलत। चंद्रहार द्यावा कीं ॥13॥

सुंदराबाई बोलली। तो आहे चोळाप्पाजवळी।
ऐसें ऐकतां त्या काळी। जमादार पाठविला ॥14॥

गंगुलाल जमादार। चोळाप्पाजवळी ये सत्वर।
म्हणे द्यावा जी चंद्रहार। राणीसाहेब मागती ॥15॥

चोळाप्पा बोले तयासी। हार नाहीं आम्हांपासी।
बाळाप्पा ठेवितो तयासी। तुम्हीं मागून घ्यावा कीं ॥16॥

ऐसें ऐकुनी उत्तर। गंगुलाल जमादार।
बाळाप्पाजवळी येउनी सत्वर। हार मागूं लागला ॥17॥

बाळाप्पा बोले उत्तर। आपणापासी चंद्रहार।
परी चोळाप्पाची त्यावर। सत्ता असे सर्वस्वें ॥18॥

ऐसें ऐकुनी बोलणें। जमादार पुसे चोळाप्पाकारणें।
जबाब दिधला चोळाप्पानें। बाळाप्पा देती तरी घेइजे ॥19॥

ऐसें भाषण ऐकोन। जमादार परतोन ।
नृपमंदिरीं येवोन। वर्तमान सर्व सांगे ॥20॥

चोळाप्पाची ऐकुनी कृती। राग आला राणीप्रती।
सुंदराबाईनेंही गोष्टी। तयाविरुद्ध सांगितल्या ॥21॥

कारभार चोळाप्पाचे करी। जो होता आजवरी।
तो काढुनी त्यास दुरी। करावे राणी म्हणतसे ॥22॥

असो एके अवसरीं। काय झाली नवलपरी।
बैसली समर्थांची स्वारी। भक्तमंडळी वेष्टीत ॥23॥

एक वस्त्र तया वेळीं। पडलें होतें श्रींजवळी।
तयाची करोनिया झोळी। समर्थें करी घेतली ॥24॥

अल्लख शब्द उच्चारिला। म्हणती भिक्षा द्या आम्हांला।
तया वेळीं सर्वत्रांला। आश्चर्य वाटलें ॥25॥

झोळी घेतली समर्थें। काय असे उणें तेथें।
जे जे दर्शना आले होते। त्यांनी भिक्षा घातली ॥26॥

कोणी एक कोणी दोन। रुपये टाकिती आणोन।
न लागतां एक क्षण। शंभरांवर गणती झाली ॥27॥

झोळी चोळाप्पातें देवोन। समर्थ बोलले काय वचन।
चोळाप्पा तुझें फिटलें रीण। स्वस्थ आता असावें ॥28॥

पाहोनिया द्रव्यासी। आनंद झाला तयासी।
परी न आले मानसीं। श्रीचरण अंतरले ॥29॥

चोळाप्पासी दूर केले। बाईसी बरें वाटलें।
ऐसे कांहीं दिवस गेले। बाळाप्पा सेवा करिताती ॥30॥

कोणे एके अवसरीं। सुंदराबाई बाळाप्पावरी।
रागावोनी दुष्टोत्तरीं। ताडण करी बहुसाळ ॥31॥

तें ऐकोनी बाळाप्पासी। दु:ख झालें मानसीं।
सोडुनी स्वामी-चरणांसी। म्हणती जावें येथोनी ॥32॥

आज्ञा समर्थांची घेवोनी। म्हणती जावें येथोनी।
याकरितां दुसरें दिनीं। समर्थांजवळी पातले ॥33॥

तेव्हां एका सेवेकर्‍यास। बोलले काय समर्थ।
बाळाप्पा दर्शनास येत। त्यासी आसन दाखवावें ॥34॥

बाळाप्पा येतां त्या स्थानीं। आसन दाविलें सेवेकर्‍यांनी।
तेव्हां समजले निजमनीं। आज्ञा आपणां मिळेना ॥35॥

कोठें मांडावें आसन। विचार पडला त्यांलागून।
तों त्याच रात्रीं स्वप्न। बाळाप्पानें देखिले ॥36॥

श्रीमारुतीचें मंदिर। स्वप्नीं आलें सुंदर।
तेथें जाउनी सत्वर । आसन त्यांनीं मांडिलें ॥37॥

श्री स्वामी समर्थ। या मंत्राचा जप करीत।
एक वेळ दर्शना येत। हिशेब ठेवित जपाचा ॥38॥

काढुनी दिलें बाळाप्पासी। आनंद झाला बाईसी।
गर्वभरें ती कोणासी। मानीनाशी जाहली ॥39॥

सुंदराबाईसी करावें दूर। समर्थांचा झाला विचार।
त्याप्रमाणें चमत्कार करोनिया दाविती ॥40॥

परी राणीची प्रिती। बाईवरी बहु होती।
याकारणें कोणाप्रती। धैर्य कांहीं होईना ॥41॥

अक्कलकोटीं त्या अवसरीं। माधवराव बर्वे कारभारी।
तयांसी हुकूम झाला सत्वरी। बाईसी दूरी करावें ॥42॥

परी राणीस भिवोनी । तैसें न केले तयांनी।
समर्थदर्शनासी एके दिनीं। कारभारी पातले ॥43॥

तयांसी बोलती समर्थ। कैसा करितां कारभार।
ऐसें ऐकोनिया उत्तर । बर्वे मनीं समजले ॥44॥

मग त्यांनीं त्याच दिवशीं। पाठविलें फौजदारासी।
कैद करुनीया बाईसी। आणावें म्हणती सत्वर ॥45॥

फौजदारासी समर्थ। कांही एक न बोलत।
कारकीर्दीचा अंत। ऐसा झाला बाईच्या ॥46॥

स्वामीचिया सेवेकरितां। सरकारांतुनी तत्त्वतां।
पंच नेमुनी व्यवस्था। केली असे नृपरायें ॥47॥

मग सेवा करावयासी। घेउनी गेले बाळाप्पासी।
म्हणती देउं तुम्हांसी। पगार सरकारांतुनी ॥48॥

बाळाप्पा बोलले तयांसी। द्रव्याशा नाहीं आम्हासी।
आम्ही निर्लोभ मानसीं। स्वामीसेवा करूं कीं ॥49॥

बाळाप्पाचा जप होतां पूर्ण। एका भक्तास सांगोन।
करविलें श्रींनीं उद्यापन। हिशेब जपाचा घेतला ॥50॥

बाळाप्पांनीं चाकरी। एक तप सरासरी।
केली उत्तम प्रकारी। समर्था ते प्रिय झाले ॥51॥

दृढ निश्चय आणि भक्ती। तैसी सदगुरुचरणीं आसक्ती।
तेंणें येत मोक्ष हातीं। अन्य साधनें व्यर्थची ॥52॥

उगीच करिती दांभिक भक्ती। त्यावरी स्वामी कृपा न करिती।
सद्भावें जे नमस्कारिती। त्यांवरी होती कृपाळू ॥53॥

अक्कलकोटनिवासिया। जयजयाजी स्वामीराया।
रात्रंदिन तुझ्या पायां। विष्णु शंकर वंदिती ॥54॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत ।
सदा भक्त परिसोत । त्रयोदशोध्याय गोड हा ॥55॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृते त्रयोदशोध्याय:।

श्रीस्वामीचरणार्पणमस्तु। शुभं भवतु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

सुंदरा बाई

Leave a Comment