श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १२

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १२

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय बारावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

बाळप्पा गुरूंचा ध्यास घेऊन अक्कलकोट येथे येण्यासाठी गाणगापूरहून निघतात. आणि येताना श्री स्वामींना नैवेद्य म्हणून, सोबत श्री स्वामींच्या आवडीची खडीसाखरही घेतात. श्री स्वामींच्या कृपेनेच अवघ्या दोन दिवसात बाळप्पा गाणगापूरहून अक्कलकोटात पायी चालतच पोहोचतात.

तेव्हा श्री स्वामी खासबागेत होते. आणि जमीनीवर निजले होते. श्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची खुप गर्दी जमली होती. या गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन घडेल का या विवंचनेत असताना, श्री स्वामींनी आपल्या एका सेवेकर्याला बाळप्पांना जवळ घेऊन येण्यास सांगितले.

श्री स्वामींचे अजानुबाहू आणि तेजःपुंज रूप पाहून भक्तीने बाळप्पांचे मन समाधी अवस्थेत गेले. आणि श्री स्वामींनी उठून खासबागेतील प्रत्येक झाडांना प्रेमाने मिठी मारून, बाळप्पा वरचे प्रेम प्रकट केले. बाळप्पा भानावर येताच त्यांनी श्री चरणास घट्ट मिठी मारली. आपल्या आनंदाश्रूंनी जणू श्री स्वामी चरणांस त्यांनी अभिषेकच केला. श्री स्वामी दर्शन घेऊन बाळप्पा धन्य झाले.

अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या सेवेची दुरवस्था होत आहे हे बाळप्पांच्या निदर्शनास आले. श्री स्वामी सेवकांमध्ये सेवेवरुन रोज भांडणे होत होती. परंतु बाळप्पांनी सर्व भांडणे मोडून काढली. आणि मठातील प्रत्येक सेवेकर्याला आपापली सेवा नेमून दिली. यामुळे बाळप्पा श्री स्वामीचे प्रिय शिष्य बनले. यामुळे मठातील काही सेवकरी तसेच सुंदरा बाई बाळप्पांचा द्वेष करीत.

बाळप्पांनी श्री स्वामी सेवेची योग्य पद्धत अमलात आणली. श्री स्वामींच्या पुजेपासून ते दर्शना पर्यन्त सर्व व्यवस्था चोख पार पडू लागल्या.

या दरम्यान बाळप्पांसोबत एक विलक्षण घटना घडली. बाळप्पा पोट दुखीच्या व्याधीने त्रस्त झाले. काही वर्षांपूर्वी कोण्या कृतघ्नाने बाळप्पांना कानोल्यातून विष खाऊ घातले होते. पण बाळप्पांच्या नशीबी श्री स्वामी सेवा करने असल्यामुळे श्री स्वामी कृपेने ते आजवर जिवंत होते. आणि श्री स्वामी कृपेने ते विष त्यादिवशी बाळप्पांच्या बेंबीतून बाहेर पडले. आणि बाळप्पा आश्चर्यकारकरित्या बचावले.

श्री स्वामी सेवे सोबतच बाळप्पा शिव शंकराची आराधना, भक्ती करत. परंतु सुंदरा बाईंनी बाळप्पाना शंकर पूजन वर्ज्य करण्यास सांगितले. आणि श्री स्वामींच्या आज्ञेने म्हणजेच चिठ्ठ्या टाकून बाळप्पांनी शिव शंकराची पूजा करने थांबविले.

ही भाणगड श्रीपाद भटांनी पाहीली. श्रीपाद भट आणि काही सेवेकरी बाळप्पांचा द्वेष करीतच होते. म्हणून श्रीपाद भट एकदा बाळप्पांना भेटले आणि म्हणाले आपण आल्यापासून आमचे खुप नूकसान होत आहे. तेव्हा तुम्ही आपल्या गावी परतावे. तेव्हा आपण श्री स्वामी आज्ञा घेऊन गावी परतू असे‌ बाळप्पांनी सांगितले.

तेव्हा श्रीपाद भटाने दोन चिठ्ठ्या टाकून पाहिले तर चिठ्ठीत, बाळप्पांनी इथेच राहून चाकरी करावी असे‌ लिहीलेले होते. श्री स्वामी कृपा झाली तर श्री स्वामी आपल्या शिष्याला कसे दूर लोटतील?

पुढे बाळप्पा सदैव श्री स्वामी सेवेत रूजू झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या बाराव्या अध्यायाची समाप्ती होते.


श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय बारावा देत आहोत.

अध्याय बारावा

श्रीगणेशाय नम:।
कराया जगदुद्धार। हरावया भूभार।
वारंवार परमेश्वर। नाना अवतार धरीतसे ॥1॥

भक्तजन तारणार्थ। अक्कलकोटीं श्रीदत्त।
यतिरूपें प्रगट होत। तेची समर्थ श्रीस्वामी ॥2॥

गताध्यायाचे अंतीं। बाळाप्पा आले अक्कलकोटीं।
पुण्य नगर पाहोनी दृष्टी। आनंद पोटी नच मावे ॥3॥

त्यादिवशीं श्रीसमर्थ। होते खासबागेंत।
यात्रा आली बहुत। गर्दी जाहली श्रींजवळी ॥4॥

दर्शनेच्छा उत्कट चित्तीं। खडीसाखर घेवोनी हातीं।
गर्दीमाजी प्रवेश करिती। स्वामीसन्निध पातले ॥5॥

आजानुबाहू सुहास्यवदन। श्रीस्वामीमूर्ती पाहोन।
बाळाप्पानें धांवोन। दृढ चरण धरियेले ॥6॥

येवोनिया भानावरती। श्रीचरणांची सोडिली मिठी।
ब्रह्मानंद न माये पोटीं। स्तोत्र ओंठीं गातसे ॥7॥

श्री समर्थ त्या वेळीं। पडले होते भूतळीं।
उठोनिया काय केली। लीला एक विचित्र ॥8॥

सर्व वृक्षांसीं आलिंगन। दिलें त्यांनी प्रेमेंकरोन।
बाळाप्पावरचें प्रेम। ऐशा कृतीनें दाविलें ॥9॥

त्यासवें एक जहागिरदार। ते होते बिर्‍हाडावर ।
स्वयंपाक करोनी तयार। म्हणती जाऊं दर्शना ॥10॥

म्हणती जाउनी स्वामीसी। अर्पण करा नैवेद्यासी।
अवश्य म्हणोनी तयांसी। बाळाप्पा तेव्हां चालले ॥11॥

या समयीं श्रीसमर्थ। असती नृपमंदिरांत।
राजाज्ञेवांचुनी तेथे। प्रवेश कोणाचा न होय॥12॥

मार्गावरुनी परतले। सत्वर बिर्‍हाडावरी आले।
तेथें नैवेद्यार्पण केले। मग सारिलें भोजन॥13॥

नित्य प्रात:काळीं उठोन। षट्कर्मातें आचरोन।
घेवोनी स्वामीदर्शन। जपालागीं बैसावें ॥14॥

श्रीशंकर उपास्य दैवत। त्याचें करावें पूजन नित्य।
माध्यान्हीं येतां आदित्य। जपानुष्ठान आटपावें ॥15॥

करीं झोळी घेवोनी। श्रीस्वामीजवळी येवोनी।
मस्तक ठेवोनि चरणीं। जावें भिक्षेकारणें ॥16॥

मागोनियां मधुकरी। मग यावें बिर्‍हाडावरी।
जी मिळेल भाजीभाकरी । त्यानें पोट भरावें॥17॥

घ्यावें स्वामीदर्शन। मग करावें अनुष्ठान।
ऐशा प्रकारें करोन। अक्कलकोटीं राहिले ।18॥

चोळाप्पा आदीकरोन। सेवेकरी बहुतजण।
त्यांत सुंदराबाई म्हणून। मुख्य होती त्या वेळीं ॥19॥

एके दिवशीं तयांसी। बाई आज्ञा करी ऐशी।
आपणही श्रीसेवेसी। करीत जावें आनंदें ॥20॥

बहुतजण सेवेकरी। बाई मुख्य त्यांमाझारीं।
सर्व अधिकार तिच्या करीं। व्यवस्थेचा होता पैं ॥21॥

या कारणें आपसांत। भांडणें होतीं सदोदीत।
स्वामीसेवेची तेथे। अव्यवस्था होतसे॥22॥

हें बाळाप्पांनीं पाहोन। नाना युक्ती योजून।
मोडुनी टाकिलें भांडण। एकचित्त सर्व केले ॥23॥

बाळाप्पाची प्रेमळ भक्ती। पाहुनी संतोष स्वामीप्रती।
दृढ भाव धरुनी चित्तीं। सेवा करिती आनंदें ॥24॥

ऐसें लोटतां कांहीं दिवस। बाळाप्पाचिया शरीरास।
व्याधी जडली रात्रंदिवस। चैन नसे क्षणभरी ॥25॥

भोग भोगिला कांहीं दिन। कागदाची पुडी बेंबींतून।
पडली ती पाहता उकलोन। विष त्यात निघालें॥26॥

पुर्वी कोण्या कृतघ्नें। बाळाप्पासी यावें मरण।
विष दिधलें कानोल्यांतुन। पडलें आज बाहेर ॥27॥

स्वामीकृपेने आजवरी। गुप्त असे उदरीं।
सदगुरुसेवा त्यांचे करीं। व्हावी लिखित विधीचें ॥28॥

प्रत्येक सोमवारीं तयांनीं। महादेवाची पूजा करोनी।
मग यावें परतोनी। स्वामीसेवेकारणें ॥29॥

हें पाहोनी एकें दिवशीं। बाई विनवी समर्थांसी।
आपण सांगुनी बाळाप्पासी। शंकरपूजनीं वर्जावेें ॥30॥

तैशी आज्ञा तयाप्रती। एके दिनीं समर्थ करिती।
परी बाळाप्पाचे चित्तीं। विश्वास कांहीं पटेना ॥31॥

बाईच्या आग्रहावरून। समर्थें दिली आज्ञा जाण ।
हें नसेल सत्य पूर्ण। विनोद केला निश्चयें ॥32॥

पूजा करणें उचित। न करावी हेंचि सत्य।
यापरी चिठ्ठया लिहित। प्रश्न पहात बाळाप्पा ॥33॥

एक चिठ्ठी तयांतुन। उचलुनी पाहतां वाचून।
न करावेंची पूजन। तियेमाजी लिहिलेंसे ॥34॥

तेव्हां सर्व भ्रांती फिटली। स्वामीआज्ञा सत्य मानिली।
ही भानगड पाहिली। श्रीपाद भटजीनें ॥35॥

श्रीपादभट्ट एके दिवशीं। काय बोलती बाळाप्पासी।
दारा-पुत्र सोडुनी देशीं। आपण येथें राहिलां ॥36॥

आपण आल्यापासोन। आमुचें होतें नुकसान।
ऐसे बोल ऐकोन । बाळाप्पा मनीं खिन्न झाला ॥37॥

स्वामीनीं मज आज्ञा द्यावी। मी जातों आपुल्या गांवीं।
परी तुम्हीं युक्ती योजावी। आज्ञा होईल ऐशीच ॥38॥

श्रीपादभट्टें एके दिवशीं। विचारिलें समर्थांसी।
कुलदेवतेच्या दर्शनासी। जावया इच्छी बाळाप्पा ॥39॥

ऐसें ऐकुनिया समर्थ। हास्यमुखें काय बोलत।
कुलदेवतेचें दर्शन नित्य। बाळाप्पा येथ करीतसे ॥40॥

श्रीपाद म्हणे बाळाप्पासी। समर्थ न देती आज्ञेसी।
तरी टाकुनी चिठ्ठयांसी। आज्ञा द्यावी आपण ॥41॥

तयाचें कपट न जाणोनी। अवश्य म्हणे त्याच दिनीं।
दोन चिठ्ठया लिहोनी। उभयतांनी टाकिल्या ॥42॥

चिठ्ठी आपुल्या करीं। भटजी उचली सत्वरी।
येथें राहुनी चाकरी। करी ऐसें लिहिलेंसे ॥43॥

स्वामीचरणीं दृढ भक्ती। बाळाप्पाची जडली होती।
कैसा दूर तयाप्रती। करितील यती दयाळ ॥44॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा प्रेमळ परिसोत। द्वादशोध्याय गोड हा ॥45॥

श्री राजाधिराज योगीराज श्रीस्वामीसमर्थ महाराजार्पणमस्तु॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री बाळप्पांचा मुळ फोटो

Leave a Comment