श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय १०

श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय  १०

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय दहावा या बद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्या पुर्व पुण्याई मुळेच आपल्याला हा मनुष्य जन्म लाभला आणि आपल्या हातून हे श्री स्वामी चरीत्र सारामृताचे लिखाण होत आहे. या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार ‌पुढे कथा लिहिण्यास प्रारंभ करतात.

हावेरी नामक गावी बाळाप्पा नावाचे, सराफीचा व्यवसाय करणारे यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते. सुख, समृद्धी आणि धनधान्याला ‌घरात काही कमी नव्हती. सर्व प्रकारचे सुख त्यांना मिळत होते. वयाच्या तिशीला त्यांचे मन प्रपंचात लागेनासे झाले. आणि त्यांना परमार्थाची ओढ लागली. प्रपंच हा क्षणभंगूर आहे. त्यातील सुखाच्या मागे धावण्या पेक्षा, शाश्वत आणि मुक्तीदायक परमार्था कडे‌ वळण्याचा बाळप्पांनी निश्चय केला.

फिरत फिरत बाळप्पा मुरगोड गावी येऊन पोहोचले. मुरगोड येथे पुर्वी चिदंबर दिक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले.

चिदंबर दिक्षितांचा परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की, मुरगोड गावी मल्हार दिक्षित नावाचे ईश्वरभक्त ब्राह्मण रहात होते. ते वेदशास्त्रसंपन्न होते. परंतु संतान सुख नसल्याने सदैव उदास रहात. संतान प्राप्ती व्हावी म्हणून मल्हार दिक्षितांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा त्यांना शिव प्रसादामुळे पुत्र रत्नाचा लाभ झाला.

साक्षात श्री शंकराने मल्हार दिक्षितांच्या पत्नी पोटी जन्म घेतला. पुढे हे बालक सर्व प्रकारच्या विध्याभ्यासात निपूण झाले. वयाच्या आठव्या वर्षी त्या बालकाने, मातीच्या हत्तीला जीवंत करून आपले देवत्व सिद्ध केले. त्यांच्याशी दूर्व्यवहार करणार्या रावबाजी पेशवे यांचे राज्य पुढं लयास गेले.

या चिदंबर दिक्षितांच्या महायज्ञ समारंभात खुद्द श्री स्वामी हजर होते. आणि श्री स्वामींकडे तुप वाढण्याची जबाबदारी होती असे ग्रंथकार लिहितात. जेवणावळीत जेंव्हा तुप संपले तेव्हा श्री स्वामींनी रित्या कलशांना स्पर्श करून, चमत्काराने सर्वांना तुप पुरवले. असे ग्रंथकाराने कथन केले आहे. अशा या चिदंबर दिक्षितांच्या भुमित बाळप्पा दाखल झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या दहाव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.

सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय दहावा देत आहोत.

अध्याय दहावा

श्रीगणेशाय नम:।
गाठी होतें पूर्वपुण्य। म्हणुनी पावलों नरजन्म।
याचें सार्थक उत्तम। करणें उचित आपणां ॥1॥

ऐसा मनीं करूनि विचार। आरंभिलें स्वामीचरित्र।
ते शेवटासी नेणार। स्वामी समर्थ असती पैं ॥2॥

हावेरी नामक ग्रामीं। यजुर्वेदी गृहस्थाश्रमी।
बाळाप्पा नामें द्विज कोणी । राहत होते आनंदें ॥3॥

संपत्ती आणि संतती। अनुकूल सर्व तयांप्रती।
सावकारी सराफी करिती। जनीं वागती प्रतिष्ठित ॥4॥

तीस वर्षांचें वय झालें। संसारातें उबगले।
सद्गुरुसेवेचे दिवस आले। मती पालटली तयांची ॥5॥

जरी संसारीं वर्तती। तरी मनीं नाहीं शांती।
योग्य सदगुरु आपणाप्रती। कोठें आतां भेटेल ॥6॥

पंचपक्वान्नें सुवर्ण ताटीं। भरोनी आपणापुढें येती।
पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी। उल्हासलें मानस ॥7॥

तात्काळ केला निर्धार। सोडावें सर्व घरदार।
मायापाश दृढतर। विवेकशस्त्रें तोडावा ॥8॥

सोलापुरीं काम आम्हांसी। ऐसें सांगुनी सर्वत्रांसी।
निघाले सदगुरु शोधासी। घरदार सोडिलें ॥9॥

मुरगोड ग्राम प्रख्यात। तेथें आले फिरत फिरत।
जेथें चिदंबर दीक्षित। महापुरुष जन्मले ॥10॥

मुरगोडीं मल्हार दीक्षित। वेदशास्त्रीं पारंगत।
धर्मकर्मीं सदा रत। ईश्वरभक्त तैसाची ॥11॥

परी तयां नाहीं संतती। म्हणोनिया उद्विग्न चित्तीं।
मग शिवाराधना करिती। कामना चित्तीं धरोनी ॥12॥

द्वादशवर्षें अनुष्ठान। केलें शंकराचें पूजन।
सदाशिव प्रसन्न होऊन। वर देत तयांसी ॥13॥

तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झालें माझें मन ।
मीच तुझा पुत्र होईन । भरंवसा पूर्ण असावा ॥14॥

ऐकोनिया वरासी । आनंदले मानसीं।
वार्ता सांगतां कांतेसी। तेही चित्तीं तोषली ॥15॥

नवमास भरतां पूर्ण। कांता प्रसवली पुत्ररत्न।
मल्हार दीक्षितें आनंदोन। संस्कार केले यथाविधी ॥16॥

चिदंबर नामाभिधान। ठेवियलें तयालागुन।
शुक्लपक्षीय शशिसमान। बाळ वाढूं लागलें ॥17॥

पुढें केलें मौंजीबंधन। वेदशास्त्रीं झाले निपुण।
निघंटु शिक्षा व्याकरण। काव्यग्रंथ पढविले ॥18॥

एकदा यजमानाचे घरीं। व्रत होतें गजगौरी।
चिदंबर तया अवसरीं। पूजेलागीं आणिले ॥19॥

प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणतां। गजासी प्राण येउनी तत्वतां।
चालूं लागला हें पाहतां। विस्मित झाले यजमान ॥20॥

ऐशा लीला अपार। दाखविती चिदंबर।
प्रत्यक्ष जे का शंकर। जगदुद्धारार्थ अवतरले ॥21॥

असो पुढें प्रौढपणीं। यज्ञ केला दीक्षितांनीं।
सर्व सामग्री मिळवूनी। द्रव्य बहुत खर्चिलें ॥22॥

तया समयीं एके दिनीं। ब्राह्मण बैसले भोजनीं।
तूप गेलें सरोनी। दीक्षितांतें समजलें ॥23॥

जलें भरले होते घट। तयांसी लावितां अमृतहस्त।
तें घृत झालें समस्त। आश्चर्य करिती सर्व जन ॥24॥

तेव्हां पुणें शहरामाजी। पेशवे होते राव बाजी।
एके समयीं ते सहजीं। दर्शनातें पातले ॥25॥

अन्यायानें राज्य करित। दुसर्‍याचें द्रव्य हरित।
यामुळें जन झाले त्रस्त। दाद त्यांची लागेना ॥26॥

तयांनी हें ऐकोन। मुरगोडीं आले धावोन।
म्हणती दीक्षितांसी सांगून। दाद आपुली लावावी ॥27॥

रावबाजीसी वृत्तांत। कर्णोपकर्णीं झाला श्रुत।
म्हणती जें सांगतील दीक्षित। तें अमान्य करवेना ॥28॥

मग दीक्षितांसी निरोप पाठविला। आम्ही येतों दर्शनाला।
परी आपण आम्हांला। त्वरीत निरोप देइजे ॥29॥

ऐसें सांगता दीक्षितांप्रती। तया वेळीं काय बोलती।
आता पालटली तुझी मती। त्वरीत मागसी निरोप ॥30॥

कोपला तुजवरी ईश्वर। जाईल राज्यलक्ष्मी सर्व।
वचनीं ठेवी निर्धार।निरोप तुजला दिला असे ॥31॥

सिद्धवाक्य सत्य झालें। रावबाजीचें राज्य गेलें।
ब्रह्मावर्तीं राहिले। परतंत्र जन्मवरी ॥32॥

एके समयीं अक्कलकोटीं। दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी।
तेव्हां बोलले स्वामी यती। आम्हीं त्यातें जाणतों ॥33॥

यज्ञसमारंभाचे अवसरीं। आम्हीं होतों त्यांचे घरी।
तूप वाढण्याची कामगिरी। आम्हांकडे तैं होती ॥34॥

महासिद्ध दीक्षित। त्यांचे वर्णिलें अल्पवृत्त।
मुरगोडीं बाळाप्पा येत। पुण्यस्थान जाणोनी ॥35॥

तेथें ऐकिला वृत्तान्त। अक्कलकोटीं स्वामीसमर्थ।
भक्तजन तारणार्थ। यतिरुपें प्रगटले ॥36॥

इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। दशमोध्याय गोड हा ॥37॥

श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु । श्रीरस्तु ॥

थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||

श्री स्वामी समर्थ

Leave a Comment