श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय ७

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सातवा या बद्दल जाणून घेणार आहोत.
अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांना श्री स्वामीं विषयी विलक्षण भक्ती होती. ते श्री स्वामी सेवा आणि भक्ती करण्यात नेहमी मग्न असत. मालोजी राजे फार धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना आपल्या राजसभेत वेदांत विषयी चर्चा श्रवण करण्याची फार आवड होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरां सारख्या विद्वान शास्त्री बुवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते.
त्या काळी मुंबईत वेदांत विषयावर जाहीर व्याख्यान करणार्या विष्णू बुवा ब्रम्हचारी यांची फारच प्रसिद्धी झाली होती. त्यांनी अनेक परधर्म प्रचारकांना वादविवादा मध्ये हरवून जनमानसात हिंदू धर्मा बद्दल जागृती निर्माण करून नामलौकीक मिळवीला होता.
त्यांची किर्ती अक्कलकोट पर्यंत येऊन पोहोचली, तेव्हा मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोटला आमंत्रित केले. विष्णु बुवा ब्रम्हचारी अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने आणि व्याख्याने देण्यास प्रारंभ केला. विष्णु बुवांची ही अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकून राजसभेतील सर्वजण आनंदाने भाराऊन जात.
अशातच बुवांना श्री स्वामीं बद्दल कळले. व श्री स्वामींना भेटण्याची त्यांना उत्सुकता जागृत झाली. काही दिवसांनी विष्णु बुवा श्री स्वामींना भेटले. पण विष्णु बुवांच्या मनात हे कोणी भोंदू साधू असावेत अशी भावना उत्पन्न झाली, त्यामुळे विष्णु बुवांनी फारसे स्वारस्य दाखविले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामींच्या अवतारीत्वा बद्दल विकल्प आला. आणि श्री स्वामींना ‘ब्रह्म तदाकार वृत्ती म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला. पण श्री स्वामींनी विष्णु बुवांना काहीच उत्तर दिले नाही. आणि विष्णु बुवांकडे पाहून श्री स्वामी फक्त स्मित हास्य करीत राहिले. हे पाहून विष्णु बुवा क्रोधित होऊन तेथून निघून गेले.
त्याच रात्री बुवांना एक स्वप्न पडले. स्वप्नात असंख्य विंचू विष्णु बुवांच्या अंगावर चढताना दिसले. त्यातून एक महा भयंकर विषारी विंचू दंश करण्यास जवळ येत असल्याचे दृष्य त्यांना दिसले. आणि भयाने त्यांची बोबडी वळली.
दुसऱ्या दिवशी विष्णु बुवांनी पुन्हा श्री स्वामींची भेट घेतली, व मागील प्रश्न पुन्हा विचारला. तेव्हा श्री स्वामींनी विष्णु बुवांना काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली. व म्हणाले “ब्रह्म तदाकार वृत्ती अशी वाटेवर पडली आहे का?
श्री स्वामींचे अंतर्ज्ञानीत्व जाणून विष्णु बुवांना पश्चात्ताप झाला. आणि ते श्री स्वामींना शरन गेले. अभिमानातून मुक्त झालेले विष्णु बुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदास योग्य झाले. व श्री स्वामींचे मोठे भक्त झाले. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृताच्या सातव्या अध्यायाची समाप्ती होते.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय सातवा देत आहोत.
अध्याय सातवा
श्रीगणेशाय नम:।
जयजयाजी निर्गुणा। जयजयाजी सनातना।
जयजयाजी अघहरणा। लोकपाला सर्वेशा ॥1॥
अक्कलकोटीं मालोजी नृपती। समर्थचरणीं जयांची भक्ती।
स्वहस्तें सेवा नित्य करिती। जाणोनि यती परब्रह्म ॥2॥
वेदांत आवडे तयासी। श्रवण करिती दिवसनिशीं।
हेरळीकरादिक शास्त्र्यांसी। वेतनें देउनी ठेविलें ॥3॥
त्या समयीं मुंबापुरीं। विष्णुबुवा ब्रह्मचारी।
प्राकृत भाषण वेदांतावरी। करुनी लोकां उपदेशिती ॥4॥
त्यांसी आणावें अक्कलकोटीं। हेतु उपजला नृपा पोटीं।
बहुत करोनी खटपटी। बुवांसी शेवटीं आणिलें ॥5॥
रात्रंदिन नृपमंदिरीं। वेदांतचर्चा ब्रह्मचारी।
करिती तेणें अंतरीं। नृपती बहु सुखावे ॥6॥
ख्याती वाढली लोकांत। स्तुती करिती जन समस्त।
सदा चर्चा वेदांत। राजगृहीं होतसे ॥7॥
एके दिवशीं सहज स्थिती। ब्रह्मचारी दर्शना येती।
श्रेष्ठ जन सांगाती। कित्येक होते तया वेळीं ॥8॥
पहावया यतीचें लक्षण। ब्रह्मचारी करिती भाषण।
कांहीं वेदांतविषय काढून। प्रश्न करिती स्वामींसी ॥9॥
ब्रह्मपद तदाकार। काय केल्यानेंं होय निर्धार।
ऐसे ऐकोनि सत्वर। यतिराज हासले ॥10
मुखें कांहीं न बोलती। वारंवार हास्य करिती।
पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती। बुवा म्हणती काय मनीं ॥11॥
हा तो वेडा संन्यासी। भुरळ पडली लोकांसी।
लागले व्यर्थ भक्तीसी। यानें ढोंग माजविलें ॥12॥
तेथोनी निघाले ब्रह्मचारी। आले सत्वर बाहेरी।
लोकां बोलती हास्योत्तरीं। तुम्ही व्यर्थ फसलां हो ॥13॥
पाहोनी तुमचे अज्ञान। यांचें वाढलें ढोंग पूर्ण।
वेदशास्त्रादिक ज्ञान। यांतें कांहीं असेना ॥14॥
ऐसे ब्रह्मचारी बोलोनी। पातले आपुल्या स्वस्थानीं।
विकल्प पातला मनीं। स्वामीसी तुच्छ मानिती ॥15॥
नित्यनियम सारोन। ब्रह्मचारी करिती शयन।
जवळी पारशी दोघेजण। तेही निद्रिस्थ जाहले ॥16॥
निद्रा लागली बुवांसी। लोटलीया कांहीं निशी।
एक स्वप्न तयांसी। चमत्कारिक पडलेंसे ॥17॥
आपुल्या अंगावरी वृश्चिक। एकाएकीं चढलें असंख्य।
महा विषारी त्यांतुनी एक। दंश आपणा करीतसे॥18॥
ऐसें पाहोनी ब्रह्मचारी। खडबडोनी उठले लौकरी।
बोबडी पडली वैखरी। शब्द एक न बोलवे ॥19॥
जवळी होते जे पारशी। जागृती आली तयांसी।
त्यांनीं धरोनी बुवांसी। सावध केलें त्या वेळीं ॥20॥
मग स्वप्नींचा वृत्तांत। तयांसी सांगती समस्त।
म्हणती यांत काय अर्थ। ऐसीं स्वप्नें कैक पडतीं ॥21॥
असो दुसर्याच दिवशीं। बुवा आले स्वामींपाशी।
पुसतां मागील प्रश्नासी। खदखदां स्वामीं हासले ॥22॥
मग काय बोलती यतीश्वर। ब्रह्मपद तदाकार।
होण्याविषयीं अंतर। तुझें जरी इच्छितसे ॥23॥
तरी स्वप्नीं देखोनी वृश्चिकांसी। काय म्हणोनी भ्यालासी।
जरी वृथा भय मानितोसी। मग ब्रह्मपद जाणसी कैसें ॥24॥
ब्रह्मपद तदाकार होणें। हें नव्हे सोपें बोलणें।
यासी लागती कष्ट करणें। फुकट हातां नयेची ॥25॥
बुवांप्रती पटली खूण। धरिले तत्काळ स्वामीचरण।
प्रेमाश्रूंनी भरले नयन। कंठ झाला सददित ॥26॥
तया समयापासोनी। भक्ती जडली स्वामीचरणीं।
अहंकार गेला गळोनी। ब्रह्मपदा योग्य झाले ॥27॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत भाविक भक्त । सप्तमोध्याय गोड हा ॥28॥
श्रीराजाधिराज योगिराज श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
