श्री स्वामी चरीत्र सारामृत (मराठी अनुवाद) अध्याय ६

श्री स्वामी समर्थ, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सहावा या बद्दल जाणून घेणार आहोत.
ज्या प्रमाणे गुरूजन आपल्या बाल शिष्यांना त्यांचे बोट धरून मुळाक्षरे गीरवतात, त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ माझ्या, मतीमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबुल करीत, मागील अध्यायातील उर्वरित कथेकडे वळतात.
श्री स्वामी चोळप्पांना सांगतात की, बडोद्याच्या राजाच्या मनात भक्ती भावच नाही, म्हणून तिथे जाण्याचे आम्हाला काही प्रयोजन वाटत नाही. श्री स्वामींचे हे बोलणे चोळप्पांनी तात्यासाहेबांच्या कानावर घातले. हे ऐकून तात्यासाहेब निराश झाले. आपले प्रयत्न निष्फळ होतील या भितीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केली. आणि गुरूचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बसविले. जेवणावळी उठवल्या आणि दानधर्मही केले. परंतु ही तात्यासाहेबांची दांभिक भक्ती ओळखून त्यांच्याकडे श्री स्वामींनी दुर्लक्ष केले.
दिवसामागून दिवस गेले, कार्य काही यशस्वी होत नाही हे जाणून, तात्यासाहेबांनी एकदा चक्क श्री स्वामींना मेण्यात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे लक्षात येताच अर्ध्या रस्त्यात कडपगावच्या ठिकाणी श्री स्वामी मेण्यातून उतरले आणि थेट अक्कलकोटला पोहोचले. असे अनेकदा घडले पण त्याचे प्रतिउत्तरही श्री स्वामींकडून तसेच मिळाले.
अखेरीस कंटाळून तात्यासाहेब पुन्हा बडोद्यास परतले. हे पाहून मल्हारराव गायकवाडांनी यशवंतराव या मराठा उमरावास अक्कलकोटला पाठवले. यशवंतराव अलंकार, वस्त्र, आभुषणे आणि द्रव्य घेऊन श्री स्वामींपाशी आले. हे पाहताच श्री स्वामींनी रौद्र रूप धारण केले. त्यांचा हा क्रोधावतार पाहून यशवंतराव जागीच लटलटा कापू लागला. आणि तेथील कार्य सोडून बडोद्यास परतावे असा यशवंतरावास निरोप आला.
याचा परिणाम असा झाला की, मल्हाररावांना आपलं राज्य गमवावे लागले. कोण्या एका साहेबांवर विषप्रयोग करण्याच्या आरोपाखाली मल्हाररावांना अटक करण्यात आली. श्री स्वामींच्या अवकृपेचच हे फळ होते. आणि इथेच श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय सहावा समाप्त होतो.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय सहावा देत आहोत.
अध्याय सहावा
श्रीगणेशाय नम:।
धरोनी शिशूचा हात। अक्षरें पंडीत लिहवीत।
तैसें हें स्वामीचरित्रामृत। स्वामी समर्थ वदविती ॥1॥
मागील अध्यायाच्या अंतीं। चोळाप्पा विनवी स्वामीप्रती।
कृपा करोनी मजवरती। बडोद्यासी चलावें ॥2॥
भाषण ऐसें ऐकोनी। समर्थ बोलती हासोनी।
मल्हाररावाचिया मनीं। आम्हांविषयीं भाव नसे ॥3॥
म्हणोनी तयाच्या नगरांत। आम्हां जाणें नव्हे उचित।
अक्कलकोट नगरांत। आम्हां राहणें आवडे ॥4॥
ऐसा यत्न व्यर्थ गेला। तात्या मनीं चिंतावला।
आपण आलो ज्या कार्याला। तें न जाय सिद्धीसी ॥5॥
परी पहावा यत्न करोनी। ऐसा विचार केला मनीं।
मग काय केलें तात्यांनीं। अनुष्ठान आरंभिलें ॥6॥
भक्ती नाही अंतरीं। दांभिक साधनांतें करी।
तयांतें स्वामी नरहरी। प्रसन्न कैसे होतील ॥7॥
मग तात्यांनीं काय केलें। सप्ताहासी ब्राह्मण बैसविले।
गुरुचरित्र आरंभिलें। व्हावयासी स्वामीकृपा ॥8॥
परी तयाच्या वाड्यांत। कधीं न गेले समर्थ।
तात्या झाला व्यग्रचित्त। कांहीं उपाय सूचेना ॥9॥
आतां जाउनी बडोद्यासी। काय सांगावें राजयासी।
आणि सकळ जनांसीं। तोंड कैसे दाखवावें॥10॥
ऐशा उपायें करोन। न होती स्वामी प्रसन्न।
आतां एक युक्ती योजून। न्यावें पळवोन यतीसी ॥11॥
असो कोणे एके दिवशीं। साधोनी योग्य समयासी।
मेण्यांत घालोनी स्वामींसी। तात्यासाहेब निघाले ॥12॥
कडपगांवचा मार्ग धरिला। अर्धमार्गीं मेणा आला।
अंतरसाक्षी समर्थाला। गोष्ट विदित जाहली ॥13॥
मेण्यांतुनी उतरले। मागुती अक्कलकोटीं आले।
ऐसें बहुत वेळां घडलें। हाही उपाय खुंटला ॥14॥
मग पुढें राजवाड्यांत। जाउनिया राहिले समर्थ।
तेव्हां उपाय खुंटत। टेंकिलें हात तात्यांनीं ॥15॥
मग अपयशातें घेवोनी। बडोद्यासी आले परतोनी।
समर्थकृपा भक्तीवांचोनी। अन्य उपायें न होय ॥16॥
परी मल्हारराव नृपती। प्रयत्न आरंभीत पुढती।
सर्वत्रांसी विचारिती। कोण जातो स्वामीकडे ॥17॥
तेव्हां मराठा उमराव। यशवंत तयाचें नांव।
नृपकार्याची धरूनी हांव। आपण पुढें जाहला ॥18॥
तो येवोनी अक्कलकोटीं। घेतली समर्थांची भेटी।
वस्त्रें अलंकार सुवर्णताटीं। स्वामीपुढें ठेवित ॥19॥
तीं पाहुनी समर्थांला। तेव्हां अनिवार क्रोध आला।
यशवंता पाहोनी डोळां। काय तेव्हां बोलले ॥20॥
अरे बेडी आणोनी। सत्वर ठोका याचे चरणीं।
ऐसें त्रिवार मोठ्यांनी। समर्थ क्रोधें बोलले ॥21॥
क्रोधमुद्रा पाहोनी। यशवंतराव भ्याला मनीं।
पळालें तोंडचें पाणी। लटलटां कापूं लागला ॥22॥
मग थोड्याच दिवशीं। आज्ञा आली यशवंतासी।
सत्वर यावें बडोद्यासी। तेथील कार्यासी सोडोनी ॥23॥
साहेबा विषप्रयोग केला। मल्हाररावावरी आळ आला।
त्या कृत्यामाजी यशवंताला। गुन्हेगार लेखिले ॥24॥
हातीं पायीं बेडी पडली। स्वामीवचनाची प्रचिती आली।
अघटित लीला दाविली। ख्याती झाली सर्वत्र ॥25॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा भक्त परिसोत। षष्ठोध्याय गोड हा ॥26॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृते षष्ठोध्याय: समाप्त:॥
शुभं भवतु ॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
