श्री स्वामी चरीत्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय ४

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी नामाचे स्मरण, श्रवण करणे तसेच त्यांचे पूजन करणे आणि स्वामींच्या भजन कीर्तनात मग्न होने इतके श्रेष्ठ कार्य करणार्यांना इतर धर्मकार्य, तीर्थाटन, योगाभ्यास, होमहवन असे काही करण्याची गरज नाही. केवळ स्वामी नाम सतत घेत राहील्याने चारही पुरूषार्थ साध्य होतात आणि जन्म मृत्युच्या फेर्यातुन मुक्तता होते.
मागील अध्यायात आपण पाहीले श्री स्वामींनी अक्कलकोटचे राजे मालोजी रावांना साक्षात दर्शन दिले, आणि पुन्हा चोळप्पाच्या घरी आले. चोळप्पा जरी निर्धन आणि गरीब असले तरी त्यांना श्री स्वामी नामाचा आणि सहवासाचा अक्षय्य खजिनाच प्राप्त झाला.
श्री स्वामींनी सहवासा दर्म्यान चोळप्पांची आणि त्यांच्या कुटुंबीयांनची हरतर्हेने परीक्षा घेतली. मात्र ते सर्व स्वामींच्या कसोटीत पुर्ण उतरले आणि श्री स्वामी कृपा प्राप्त कर्ते झाले. अक्कलकोटात श्री स्वामींची किर्ती सर्वत्र व सर्वदूर पसरली. दूर दूरच्या गावाहून भक्तजन अक्कलकोटास येऊ लागले. अनेकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या. श्री स्वामीं चरणी येणार्या भक्तांचे प्रमाण दिवसागणिक वाढू लागले. मात्र, त्यात काही कुटील निंदकही होते.
असेच एकदा दोन संन्यासी श्री स्वामींची परीक्षा घेण्यासाठी अक्कलकोटास आले. श्री स्वामींनी त्यांचा कुटील हेतू ओळखला. त्या दिवशी श्री स्वामी ज्या भक्ताच्या घरी होते तेथे अनेक दर्शनार्थी फळफळावळ घेऊन जमले होते. मात्र श्री स्वामींनी आलेला प्रसाद त्या दोन संन्यासी पुढे ठेवला. परंतु श्री स्वामी स्वतः दिवसभर उपाशी असल्याने ते संन्यासी देखील जेवले नाहीत.
अशातच संपूर्ण दिवस सरला. आणि ते दोघेही संन्यासी त्या दिवशी केवळ उपाशी राहिले. कारण सुर्यास्तानंतर संन्यासाला भोजन वर्ज्य आहे. यावरून श्री स्वामी हे ढोंगी साधू नाहीत याची खात्री पटल्याने ते संन्यासी श्री स्वामींची क्षमा याचना करु लागले. अशा रीतीने श्री स्वामी चरीत्र सारामृत अध्याय चौथा इथं समाप्त होतो.
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.
सोबतच आम्ही आपणासाठी मुळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय चौथा देत आहोत.
अध्याय चौथा
श्रीगणेशाय नम: ।
स्वामीनामाचा जप करितां। चारी पुरुषार्थ येती हाता।
स्वामीचरित्र गातां ऐकतां। पुनरावृत्ती चुकेल ॥1॥
गताध्यायाचे अंतीं। अक्कलकोटीं आले यती।
नृपराया दर्शन देती। स्वेच्छेनें राहती तया पुरीं ॥2॥
चोळाप्पाचा दृढ भाव। घरीं राहिले स्वामीराव।
हें तयाचें सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्यातें ॥3॥
चोळाप्पाची सदगुणी कांता। तीही केवळ पतिव्रता।
सदोदित तिच्या चित्ता। आनंद स्वामीसेवेचा ॥4॥
स्वामी केवळ ईश्वरमूर्ती। देशोदेशीं झाली ख्याती।
बहुत लोक दर्शना येती। कामना चित्तीं धरोनी ॥5॥
कोणी संपत्तीकारणें। कोणी मागती संतानें।
व्हावें म्हणोनिया लग्न। येती दूर देशाहुनी ॥6॥
शरीरभोगें कष्टले। संसारतापें तप्त झाले।
मायामय पसार्यातें फसले। ऐसे आले कितीएक ॥7॥
भक्त अंतरीं जें जें इच्छिती। तें तें यतिराज पुरविती ।
दृढ चरणीं जयांची भक्ती। त्यांसीं होती कल्पतरू ॥8॥
जे कां निंदक कुटिल। तयां शास्ते केवळ।
नास्तिकांप्रती तत्काळ। योग्य शासन करिताती ॥9॥
कोणी दोन संन्यासी। आले अक्कलकोटासी।
हंसोनी म्हणती जनांसी। ढोंगियाच्या नादीं लागलां ॥10॥
हा स्वामी नव्हे ढोंगी। जो नाना भोग भोगी।
साधू लक्षण याचे अंगी। कोणतें हो वसतसे ॥11॥
ऐसें तयांनीं निंदिले। समर्थांनीं अंतरीं जाणिलें।
जेव्हां ते भेटीसी आले। तेव्हां केलें नवल एक ॥12॥
एका भक्ताचिया घरीं। पातली समर्थांची स्वारी।
तेही दोघे अविचारी। होते बरोबरी संन्यासी ॥13॥
तेथें या तिन्ही मूर्ती। बैसविल्या भक्तें पाटावरती।
श्रीस्वामी आपुले चित्ती। चमत्कार म्हणती करूं आतां ॥14॥
दर्शनेच्छु जन असंख्यात। पातले तेथे क्षणार्धांत।
समाज दाटला बहुत। एकची गर्दी जाहली ॥15॥
दर्शन घेउनी चरणांचें। मंगल नाम गर्जती वाचें।
हेतू पुरवावे मनींचे। म्हणोनियां विनविती ॥16॥
कोणी द्रव्य पुढें ठेविती। कोणी फळे समर्पिती।
नानावस्तु अर्पण करिती। नाही मिती तयांतें ॥17॥
कोणी नवसातें करिती। कोणी आणोनिया देती।
कोणी कांहीं संकल्प करिती। चरण पूजिती आनंदें ॥18॥
संन्यासी कौतुक पाहती। मनामाजी आश्चर्य करिती।
क्षण एक तटस्थ होती। वैरभाव विसरोनी ॥19॥
स्वामीपुढें जे जे पदार्थ। पडले होते असंख्यात।
ते निजहस्तें समर्थ। संन्याशापुढें लोटिती ॥20॥
मोडली जनांची गर्दी। तों येवोनी सेवेकरी।
संन्याशांपुढल्या नानापरी। वस्तू नेऊं लागले ॥21॥
समर्थांनी त्या दिवशीं। स्पर्श न केला अन्नोदकासी।
सूर्य जातां अस्ताचळासी। तेथोनिया ऊठले ॥22॥
दोघे संन्यासी त्या दिवशीं। राहिले केवळ उपवासी।
रात्र होता तयांसी। अन्नोदक वर्ज्य असे ॥23॥
जे पातले करुं छळणा। त्यांची जाहली विटंबना।
दंडावया कुत्सित जनां। अवतरले यतिवर्य ॥24॥
इति श्री स्वामी चरित्रसारामृत। नाना प्राकृत कथा संमत।
सदा परिसोत प्रेमळ भक्त। चतुर्थोध्याय गोड हा ॥25॥
श्रीस्वामीराजार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥ शुभं भवतु ॥
थोड्याच दिवसात आम्ही स्वामी भक्तांना आलेल्या सत्य अनुभवांवर ब्लॉग सुरु करणार आहोत. आणि ज्यांना हे अनुभव आले त्यांचेही नाव ब्लॉग मध्ये लिहु. तर लवकरात लवकर तूमचे अनुभव आम्हाला मेल करा. आमचा ई मेल एड्रेस आहे, rajesh.kamble01@gmail.com
तर लवकरच भेटू नव्या लेखाद्वारे तोपर्यंत सर्व स्वामीभक्तजनांना श्री स्वामी समर्थ||
